वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुस-यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री १०.३० वाजता अध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-यांदा बायबलवर हात ठेवून पदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईने १९५५ मध्ये एक बायबल दिले होते. त्यावर हात ठेवून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती शपथ घेताना फक्त ३५ शब्दात शपथ घेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ ३५ शब्द असतात. ‘‘मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन.’’ असे ते यावेळी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.