न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अमेरिकेतील एका न्यायालयाने फसवणूक प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना चार लाख डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क टाइम्सला कायदेशीर शुल्क म्हणून ३,९२,६३८ डॉलर भरण्याचे आदेश दिले. हे प्रकरण कर्ज फसवणुकीशी संबंधित आहे.
न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर काही पत्रकारांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. ज्यात पत्रकारांनी दावा केला होता की, ट्रम्प यांनी कर्ज घेण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चुकीची माहिती दिली होती.
त्यामुळे ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी पत्रकारांसह संस्थेवर गुन्हा दाखल केला. अशा परिस्थितीत या प्रकरणी सुनावणीदरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आता न्यायालयाने पत्रकार आणि संस्थेची या खटल्यापासून सुटका केली आहे आणि ट्रम्प यांना कायदेशीर शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत.
याआधी मे महिन्यात न्यायाधीश रॉबर्ट रीड यांनी वृत्तपत्र आणि तीन पत्रकार (सुझान क्रेग, डेव्हिड बारस्टो आणि रसेल ब्युटनर) यांच्याविरुद्धचा खटला फेटाळून लावला होता. ताज्या सुनावणीदरम्यान, रीड यांनी सांगितले की प्रकरणांची गुंतागुंत आणि प्रकरणातील इतर घटक पाहता, ट्रम्प यांना टाइम्स आणि पत्रकारांना कायदेशीर शुल्क म्हणून ३,९२,६३८ डॉलर द्यावे लागतील.