वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॅरिफमुळे जगभर आर्थिक उलथापालथ होत असताना आज ऐनवेळी ट्रम्प यांनी ७५ देशांच्या आयात वस्तूंवरील वाढीव कराला ९० दिवसांची स्थगिती दिली. त्यामुळे भारतासह या ७५ देशांना दिलासा मिळाला आहे. परंतु त्याचवेळी चीनवर मोठा आर्थिक प्रहार केला. चिनी उत्पादनांवर थेट १२५ टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
याआधी अमेरिकेने हा दर वाढवून १०४ टक्के केला होता. त्यानंतर चीननेही अमेरिकेतून येणा-या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून ८४ टक्के केले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर १२५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. दुसरीकडे भारतासह७५ देशांना ट्रम्प टॅरिफ’मधून ९० दिवसांसाठी दिलासा दिला. या कालावधीत फक्त १० टक्के शुल्क लागू राहणार आहे. जगातील अनेक बड्या देशांमध्ये व्यापारी तणावाने टोक गाठलेले असताना हा निर्णय आला आहे.
चीनविरोधात ट्रम्प आक्रमक
चिनी वस्तूंच्या आयातीवर १२५ टक्के कर आकारणीचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय हे आतापर्यंतचे सर्वात आक्रमक पाऊल मानले जात आहे. चीनने जागतिक बाजाराप्रती सन्मान दाखवलेला नाही. त्या बदल्यात अमेरिका आता १२५ टक्के शुल्क वसूल करेल. अमेरिका आता शोषण सहन करणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.