चिंचवड : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असणार आहे.
दोन्हीकडे तीन-तीन पक्ष असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी सुरुंग लावले आहे. याठिकाणचे अनेक नेते, पदाधिकारी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या विद्यमान आमदार आहेत.
मतदारसंघामध्ये अश्विनी जगताप तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अश्विनी जगताप या जर ‘तुतारी’ हाती घेऊन लढल्या तर या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून दीर आणि भावजय यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळेल.