नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९२० साली काँग्रेसचे अधिवेशन नागपूरमध्ये पार पडले होते. त्यानंतर आता जवळपास शंभर वर्षांनंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडताना पाहायला मिळत आहे. नागपूर किंवा विदर्भाने काँग्रेसला नेहमीच भरभरून दिले आहे. तसेच, आजही विदर्भात काँग्रेसची पकड पाहायला मिळते. अशात नागपूरमध्ये आज काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तर, या अधिवेशनात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात ‘हैं तय्यार हम’ या ‘टॅग लाईन’खाली महारॅली आयोजित करण्यात आली आहे. शहरातील बहादुरा येथील भारत जोडो मैदानावर दुपारी दोन वाजता होणा-या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे.
या सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज येणा-या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.