39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाबंगळूरूत ५४९ धावांची त्सुनामी; केवळ २५ धावांनी आरसीबीचा पराभव

बंगळूरूत ५४९ धावांची त्सुनामी; केवळ २५ धावांनी आरसीबीचा पराभव

बंगळूरू : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धापा टाकल्या. सनरायझर्स हैदराबादच्या २८७ धावांच्या प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात दणक्यात झाली होती. पण, पुन्हा एकदा विराट कोहलीची विकेट पडली आणि गाडी गडगडली. एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्स याचे कौतुक करायला हवे, त्याने अनुभव कामी आणत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन सामना फिरवला. दिनेश कार्तिकने मैदान गाजवताना आरसीबीसाठी अखेरपर्यंत संघर्ष केला, परंतु ऐतिहासिक विजयाला तो मुकला.

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसने आरसीबीला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी ६.२ षटकांत ८० धावा फलकावर चढवल्या. मयांक मार्कंडेने आरसीबीला मोठा धक्का दिला. विराट २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर त्रिफळाचीत झाला. विल जॅक्स ( ७) रन आऊट झाला, तर मार्कंडेने त्याची डावातील दुसरी विकेट घेताना रजत पाटीदारला ( ९) बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस हाच एक अडथळा उभा होता आणि १०व्या षटकात पॅट कमिन्सने तोही दूर केला. फॅफ २८ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला. कमिन्सने त्याच षटकात सौरव चौहानला बाद करून आरसीबीची अवस्था बिनबाद ८० वरून ५ बाद १२२ अशी केली.

महिपाल लोम्रोर व दिनेश कार्तिक यांनी २५ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी करून आरसीबीच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. पण, वर्ल्ड कप विजेत्या कमिन्सने पुन्ह डोके लावले आणि ही भागीदारी तोडली. थोडा संथ पण आखूड चेंडूवर त्याने महिपालचा ( १९) त्रिफळा उडवला. कार्तिक झुंज जेत होता आणि संघाला १८ चेंडूंत ७२ धावा करून देण्याचे अशक्यप्राय आव्हान त्याने स्वीकारले होते. पण, भुवनेश्वर कुमारने १८वे षटक सुरेख फेकले अन् १४ धावाच दिल्या. १२ चेंडूंत ५८ धावा फउइ ला हव्या होत्या. १९व्या षटकात कार्तिकच्या दमदार खेळीला टी नटराजनने ब्रेक लावला. कार्तिकने ३४ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८३ धावांची वादळी खेळी केली. फउइ ने ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात ५४९ धावा झाल्या आणि ट्वेंटी-२०तील या सर्वोत्तम ठरल्या.

तत्पूर्वी, ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा ( ३४) यांनी ७.१ षटकांत शतक झळकावले. हेड थांबणारा नव्हता आणि त्याने ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावा चोपल्या. त्याची व हेनरिच क्लासेनची ५७ ( २६ चेंडू) धावांची भागीदारी दमदार राहिली. क्लासेनने ३१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६७ धावा चोपल्या. एडन मार्कराम व अब्दुल समद यांनी १९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या व संघाला ३ बाद २८७ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएल इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. समद १० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर, तर मार्करम १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR