नागपूर : मराठवाड्यामध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून शासनाने पाठवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांच्यासारख्या स्ट्रॉंग ऑफिसरची राज्याला किंबहुना मराठवाड्याला गरज आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलली आहेत. मराठवाड्यामध्ये विशेषत: बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिका-यांच्या अनेक वर्षांपासून बदल्या झालेल्या नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिस विभागात तर अनेक अधिकारी एकाच जागेवर कित्येक वर्षांपासून काम करत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व प्रकरणात आता मराठवाड्यामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशा अधिका-यांचे नाव दमानिया यांनी सुचवले आहे.
या संदर्भात बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, माझ्याकडे अनेक प्रकरणावर पुरावे येत आहेत. रोज मेसेज येत आहेत, रोज व्हीडीओ येत आहेत. हे सर्व पाहून मला रात्रीची झोप येत नाही. धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधातील कृषी घोटाळ्याची मोठी मालिका उपलब्ध झाली आहे. त्यात त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढले होते. बीड मधील राजकीय दहशतवादावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले. प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या टोळ्या आहेत. या सर्वांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र यावर प्रशासकीय यंत्रणेत कडक ऑफिसर आणायला हवेत, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
सतीश भोसले प्रकरणावरुन पोलिसांवर टीका
सतीश भोसले प्रकरणांमध्ये ते अद्याप पोलिसांना सापडला नसला तरी देखील त्याने माध्यमांना मुलाखत दिली आहे. यावरून देखील अंजली दमानिया यांनी पोलिसांवर टीका केली आहे. पोलिस अधीक्षकांनी चॅनल वर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांवर कारवाई करावी, असा टोला त्यांनी लगावला. सतीश भोसले प्रकरणात तो अद्यापही फरार असला तरी देखील त्याने वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.