24.5 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमहाराष्ट्रतूर खरेदीला २८ मे पर्यंत मुदतवाढ

तूर खरेदीला २८ मे पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २८ मे २०२५ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तूर उत्पादक शेतक-यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

राज्यात तूर खरेदीची मुदत १३ मे पर्यंत देण्यात आली होती. तूर उत्पादक शेतक-यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसा प्रस्ताव पणन विभागाकडून केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. या मागणीची दखल घेत ही मुदत २८ मे २०२५ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

राज्यात १ लाख ३७ हजार ४५८ शेतक-यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्या पैकी १३ मे २०२५ पर्यंत ६९,१८९ शेतक-यांकडून १,०२,९५१ मे.टन तूर खरेदी झालेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी ९० दिवसांची मुदत १३ मे रोजी संपली होती. उर्वरित नोंदणीकृत शेतक-यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR