सोलापूर : कारखान्यात काम करणाऱ्या मुनिमाने रिक्षातून ४० हजार रुपयांचे टर्किश टॉवेलचे तागे चोरून नेत असताना मालकाने त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने त्यास कोर्टापुढे उभे करताच चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
श्रीनिवास सुदर्शन चन्ना व रिक्षाचालक सिकंदर शेख (रा. गांधीनगर, सोलापूर), अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारखानदार श्रीलता अशोक दुडम (वय- ५०, रा. साईबाबा चौक,सोलापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदला. अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात फिर्यादीचा लता इंडस्ट्रीज नावाचा टॉवेल कारखाना आहे. कारखान्यातील काम पाहण्यासाठी फिर्यादीने आरोपी श्रीनिवास चन्ना याच्यावर मुनीम म्हणून जबाबदारी दिली होती.
मात्र, कारखान्यातून श्रीनिवास हासिकंदरच्या रिक्षात तागे भरून घेऊन जाताना फिर्यादीच्या निदर्शनास आला. यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानंतर हवालदार डोके यांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास हवालदार डोके करत आहेत.
रिक्षात तागे भरुन जात असताना मालकाला हा प्रकार कळला. मालकाने तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांचे पथक येऊन त्याला जेरबंद केले.