परभणी : सद्यस्थितीत ट्वेंटीवन शुगर्स कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत बंदी आणलेल्या तसेच मराठवाडा विभागासाठी शिफारस नसलेल्या ऊस जातीची लागवड झाली आहे. शिफारस नसलेल्या ऊस जातींची लागवड झाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये चाबुक काणी, गवताळ वाढ, तांबेरा, पोक्का बोईंग रोगांचा प्रादुर्भाव वाढून शेतक-यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारखाना कार्यक्षेत्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेल्या ऊस जातींची माहिती लागवड व्हावी व त्या माध्यमातून शेतक-यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने शेतक-यांमध्ये संशोधन केंद्रांची शिफारस असलेल्या ऊस जातींबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. ऊस पिकाचे एकात्मिक कीड, रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन याची माहिती शेती विभागातील कर्मचा-यांना व्हावी या अनुषंगाने ट्वेंटीवन शुगर्स युनिट २चे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष पाटील, मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे येथील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती विभागातील कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये व्हीएसआयचे ऊस पैदासकार डॉ. जुगल रेपाळे यांनी महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस असलेल्या ऊस जातींची गुणवैशिष्ट्ये, मातृत्व-पितृत्व, प्रति हेक्टरी उत्पादकता आणि साखर उतारा, त्याचप्रमाणे ऊस जात तयार करण्यासाठी लागणारा कालावधी, त्रिस्तरीय बेणे मळा पद्धती, रोप पद्धतीने ऊस लागवड केल्यामुळे खर्चामध्ये होणारी बचत बाबत विस्तृतपणे माहिती दिली. व्हीएसआयच्या मृद शास्त्रज्ञा ज्योती खराडे यांनी माती परीक्षण करणे, माती परीक्षण आधारित ऊस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खताच्या ग्रेड निहाय संतुलित मात्रा करण्याचे गणित, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा व जिवाणू खतांचा वापर करणे बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
सिएओ गडदे यांनी अडचणी व पूर्व हंगाम ऊस लागवड २०२५-२६ करिता कारखान्याचे धोरण बाबत कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. सिडीओ येळकर यांनी सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये निदर्शनास येत असलेल्या कीड रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. कारखाना प्रक्षेत्रावर उपलब्ध असलेल्या ऊस जातींच्या शरीर शास्त्राची निरीक्षणे दाखवून ऊस जात ओळख प्रात्यक्षिक प्रशिक्षण दाखवण्यात आले. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी सुरेश आळसे, सुदाम कदम, रतन कदम, कार्यालयीन अधीक्षक सुरेंद्र बिरादार, विभाग प्रमुख, गटप्रमुख, स्लीप बॉय उपस्थित होते.