हिंगोली : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु असून रविवारी एकाच दिवशी १४१.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीविषयक नुकसानीबाबत जिल्ह्याचे एकूण पेरणी क्षेत्र ३ लाख ४९ हजार ८५९ हेक्टरपैकी अंदाजे २ लाख ५८ हजार ८९८ हेक्टर शेती पिक नुकसान झालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे करुन २ दिवसांत माहिती प्राप्त होतील. जिरायत बाधित क्षेत्रासाठी मदत रक्कम प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये असून तीन हेक्टरच्या मर्यादेत देय आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर तर फळपिके पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देय असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.
दहा वर्षीय मुलीसह एकाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून यामध्ये वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील ३८ वर्षीय सुभाष बाबुराव सवंडकर या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमाप्रमाणे ४ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वसमत तालुक्यातील पारवा येथील महेश संतोष कदम(२२) यांच्या पायावर वीज पडून जखमी झाला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधा
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनांचे नुकसान झालेले आहे. पावसामुळे शेतीपिकांचे तसेच पशुधनाचे पंचनामे सुरु करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा व्यवस्थापन कक्ष सुसज्ज ठेवण्यात आलेला आहे. काही अडचण आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.