24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरएमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

सोलापूर : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे. दोघांनाही २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. बी २०, स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेआळी रोड, जी. जी. कॉलेज रोड, वसई, जि. पालघर), रमेश नरसिंह आयथा (वय ४२, रा. गणेश नगर, बस स्टँड, मौलाअली, मलकजगिरी, हैदराबाद) अशी कोठडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली.

१७ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील देवडीपाटी (ता. मोहोळ) येथील हॉटेल श्री साईसमोर दोघांना अटक करीत सहा कोटी दोन लाखांचा तीन किलो १० ग्रॅम ड्रग जप्त केला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संशयित हे चंद्रमौळी व चिंचोळी एमआयडीसीत ड्रग तयार करीत असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले होते.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फय्याज हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडले. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने १६ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयथा याला हैदराबादेतून ताब्यात घेतले. दोघांनाही येथील विशेष न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, फौजदार सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, हेडकॉन्‍स्टेबल सलीम बागवान, विजयकुमार भरले, नाईक दीपाली जाधव, कॉन्स्टेबल अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते, सायबरचे अभिजित पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी देवडी फाट्याजवळ दत्तात्रय व गणेश घोडके यांना पकडून ड्रग जप्त केले होते. त्यानंतर ग्रामीण, स्थानिक व मोहोळ पोलिसांनी उत्तर भारतातील प्रयागराज, रिवा, दक्षिण भारतातील चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद व तेलंगणात शोध घेतला. मध्यप्रदेशातील बरगढ (जि. चित्रकुट), कर्नाटकातील बीदर, तेलंगणातील जहिराबाद येथून संशयितांना अटक केली आहे. सूत्रधारासह दोघांना अटकेनंतर एकूण संशयितांची संख्या १३ झाली आहे. त्यांच्याकडून आठ कोटी ८२ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात एमडी ड्रगसह, त्यासाठीचा कच्चा माल, वाहने, मोबाईलचा समावेश आहे. तर पोलिसांकडून आणखी चौघा संशयितांचा शोध सुरू आहे. यात मुख्य सूत्रधार फय्याजच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

संशयित हे गुन्ह्यातून सुटल्यावर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ड्रग निर्मिती करतात. त्यामुळे या टोळीचा बीमोड करण्यासाठी या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले. ड्रग माफिया हे औद्योगिक वसाहतीत दुर्लक्षित जागी व बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन ड्रग निर्मिती करायचे. आता त्यांचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी औद्योगिक वसाहतींवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी नागरी वसाहतीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग रहावे. संशयास्पद आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केले.

ड्रग आढळल्यानंतर चिंचोळी व चंद्रमौळी एमआयडीसीत पाच पथकांच्या माध्यमातून दीड महिने तपासणी मोहीम राबविण्यात आली. जेथे ड्रग आढळले त्या कारखान्यांविषयीची कागदपत्रे, माहिती एमआयडीसीकडे मागितली आहेत. ती मिळाल्यानंतर यात मालकांचा सहभाग आहे का, यासह विविध बाबींचा विचार करुन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ठरेल. तसेच या गुन्‍ह्यातील एका कारखान्याचा भाडेकरार संशयिताच्या तर दुसरा अन्य व्यक्तीच्या नावे होता, असे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR