धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारातील राजे लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १४ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून एका महिलेकरवी वेश्या व्यवसाय करून घेणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली. अटक केलेले दोन्ही आरोपी औसा तालुक्यातील मुळ रहिवाशी आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे दि. १४ रोजी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवाराज राजे नावाचे लॉज आहे. या लॉजवर काहीजण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी महिलेकरवी वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीसांनी दि. १४ जून रोजी सायंकाळी राजे लॉजवर छापा टाकला. यावेळी आरोपी किसन नागनाथ कठारे (वय ३२ वर्षे), रा. न्हावी गल्ली, महादेव गल्ली पाठीमागे औसा व अविनाश दिनकर माळी (वय २४ वर्षे), रा. पांढरे वस्ती नागरसोगा ता. औसा हे दोघे संगणमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय चालवित असताना आढळले.
काक्रंबा शिवारातील राजे लॉजवरती एका महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देऊन तीला ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता परावृत्त करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्या कडून वेश्या व्यवसाय करून घेऊन यावरती हे दोघे उपजिवीका करीत असताना मिळून आले. पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका केली. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोघांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५ अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.