सोलापूर : शहर सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्टमधील गुन्ह्यात सहभागी असणा-या दोन गुन्हेगारांना गुजरात येथून अटक केली असून अन्य तीन आरोपी दुबईत फरार झाले आहेत.
घवलभाई विपुलभाई शाह(३९), हार्दिक रोहितभाई शाह (४३, दोघे रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. एका केमिकल कंपनीतील निवृत्त अधिका-याने याबाबत शहर सायबर पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दिली होती. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन व्हॉटसअॅपद्वारे ऑडिओ व व्हीडीओ कॉल करून त्यांनी स्वत:ला आयपीएस अधिकारी व सीबीआय अधिकारी बोलतो असे सांगून तक्रारदाराला प्रथम त्यांच्या नावाचे एक सिमकार्ड क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे व त्यावरुन व्हॉटसअॅपद्वारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झाले आहेत व त्याबाबत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तुम्हाला यात आम्ही डिजिटल अरेस्ट केली असल्याचे सांगितले. याबाबत कोणाशी काहीही चर्चा करावयाची नाही, कोणाला काही सांगायचे नाही, अशी भीती घातली. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना अरेस्ट वॉरंट, सुप्रीम कोर्टाची नोटीस, सव्हॅलन्सचे ३ पानी इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटसअॅपवर पाठवून ती वाचण्यास लावून त्याचा अर्थ त्यांनी तक्रारदार यांना सांगितला. तसेच तक्रारदार यांना तुम्हाला कोठेही बाहेर जाता येत नाही, बाहेर जायचे असल्यास आम्हाला विचारा, तुमचा कॅमेरा सतत चालू पाहिजे, तुम्ही कॅमे-यासमोर पाहिजे, असे सांगून तक्रारदाराला मोबाइलवर व्हॉटसअॅप व्हीडीओ कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितले.
त्यावरुन वेगवेगळ्या लोकांनी स्वत:ला मोठे पदाचे अधिकारी आहोत असे सांगून, बोलू लागले. त्यावेळी ते स्वत: चा चेहरा दाखवित नव्हते. त्यानंतर समोरील अनोळखी आयपीएस पोलिस अधिकारी विजय खन्ना यांनी, कोण कोणत्या बँकेत खाते आहे?, एफडी किती आहे?, म्युचुअल फंड शेअर्स आहेत का? याची माहिती घेतली व तक्रारदार यांना तुमच्याजवळ कोणीही नसेल अशा ठिकाणी एका खोलीत बसण्यास सांगून बनावट सीबीआयचे राहुल गुप्ता यांनी तक्रारदार आता कोर्टासमोर तुमच्या वतीने म्हणणे मांडतो, मग तुम्ही कोटांशी बोला, कोर्ट काय निर्णय घेईल.
त्यास तुम्ही जबाबदार असाल, असे सांगितले. थोड्या वेळाने कोर्ट म्हणून एका अनोळखी व्यक्तीने, कॅनरा बँकेतील तुमच्या नावावरील खात्यामधून रक्कम ट्रान्स्फर मनी लॉन्डरिंगमध्ये झालेली आहे, त्याचे पुरावे आमचे समोर आहेत, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे असे बोलल्यानंतर तक्रारदाराने त्यांना माझा त्या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही असे सांगितले असता, कोर्टाने मला, हे मान्य नाही, तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही, त्यामुळे तपासकामी सदरचे कोर्ट सध्या स्थगित करीत आहोत असे म्हणून तीनवेळा टेबलावर कशाने तरी मारल्याचा आवाज काढला.
त्यानंतर सीबीआयचे राहुल गुप्ता यांनी तक्रारदार यांना उद्देशून, तुम्हाला कोर्टाचा डिसीजन कळवू, तुम्ही बसून राहा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कोर्टाचे एकूण पाच पानांचा निर्णय असलेला इंग्रजीतील मजकूर असलेली ऑर्डर तक्रारदाराच्या व्हॉटसअॅपवर पाठवून ती त्यांना पूर्ण वाचण्यास लावून आरबीआयच्या गाईडलाइनप्रमाणे तपास कामात सहकार्य केले पाहिजे, असे समजावून सांगितले. एक सिक्रेट खाते असते, त्यावर तुम्ही तुमची रक्कम नोटरी करुन आम्हाला जमा करायची असते, ती तुम्हाला आमचा तपास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४८ तासांत परत मिळतील असे सांगून, एकूण २७ लाख १० हजार रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठविण्यास भाग पाडून त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर सायबर एक्स्पर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याद्वारे अहमदाबाद गुजरात येथून आरोपी धवलभाई शाह वहार्दिक शाह यांना अटक केली आहे. सदर आरोपींकडून पोलिस कोठडीदरम्यान त्यांच्या पाच साथीदारांना निष्पन्न केले असून त्यापैकी तीन आरोपी हे सध्या दुबई येथे परागंदा झाले आहेत. सदर गुन्ह्यात अटक आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल व फसवणूक रकमेपैकी ३ लाख १० हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. सध्या अटकेतील दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाला आहे व उर्वरीत आरोपीचा शोध सुरु आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस अंमलदार कृष्णात जाधव, रतिकांत राजमाने यांनी केली.