इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या दंगलीच्या आगीत होरपळत असून जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या दंगलीत आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. या दंगलीत क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट आणि स्वयंचलित तोफाही वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादावरुन दोन समुदयांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले आणि पेवार, टांगी, बालिशखेल, खार काले, मकबाल, कुंज अलीझाई, पारा चमकनी आणि करमनसह अनेक भागात ही दंगल पसरली. या दरम्यान, दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट लॉन्चरसह अनेक शस्त्रांचा मारा करण्यात आला. २४ जुलैपासून सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत ५० जणांनी जीव गमावला असून २०० हून अधिक जखमी आहेत.
हिंसाचार का भडकला?
पाकिस्तानातील या दंगलीमागे जमिनीचा तुकडा असल्याचे सांगितले जात आहे. गुलाब मिल्ली खेल आणि मिडगी कुल्ले, या आदिवासी समुदायांमध्ये ३० एकर जमिनीसाठी अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. गुलाब मिली खेळ शिया समुदायाचा आहे, तर मिदागी कुल्ले खेल सुन्नींचा आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येही याच जमिनीच्या तुकड्यावरून वाद झाला होता. त्यावेळी कुर्रममध्ये झालेल्या जातीय संघर्षात अर्धा डझनहून अधिक लोक मारले गेले. आता पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा भागातील कुर्रम जिल्ह्यात असलेल्या जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये संघर्ष पेटला आहे.
सध्या सर्व शाळा, महाविद्यालये बंद
गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष पुन्हा पेटल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा तात्काळ बंद ठेवण्यात आल्या असून मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही दिवसभर बंद ठेवण्यात आली आहे. दंगलग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.