जयपूर : भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्येही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपने घोषणा केली आहे. राजस्थान भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ठेवला होता. त्यावर सर्व आमदारांनी एकमताने संमती दिली. दरम्यान, मध्यप्रदेशनंतर आता राजस्थामध्येही भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच वासुदेव देवनानी हे विधानसभा अध्यक्ष असणार आहेत. हे नाव निवडण्यापूर्वी भाजपमध्ये दीर्घ विचारमंथन सुरू होते. तसेच निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून दिया कुमारी यांच्यासह अनेकांची नावे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येत होती.