शिवपुरी : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात फोरलेन हायवेवर भीषण अपघात झाला. यामध्ये अर्टिंगा कार उालटून कारमधील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार डॉक्टर जखमी झाले आहेत.
हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी लुकवासा पोलिस ठाणे क्षेत्रात शिवपुरी-गुना हायवेवर त्यांची कार अनियंत्रित झाली, यामुळे ती उलटून पुलावरून खाली कोसळली. दहा दिवसांपूर्वी हे सर्व डॉक्टर तिर्थयात्रेसाठी गेले होते. डॉ. अतुल आचार्य हे कार चालवत होते. कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलिस ठाण्याची मदत आली आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉ. अतुल आचार्य हे भिवंडीचे असल्याचे सांगितले जात आहेत. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे.
जखमींमध्ये डॉ. उदय जोशी (६४) रा. दादर, डॉ. सुबोध पंडित (६२) रा. वसई,
डॉ. अतुल आचार्य (५५) रा. भिवंडी आणि डॉ. सीमा जोशी (५९) यांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये अतुल आचार्य यांची पत्नी डॉ. तन्वी आचार्य (५०) व सुबोध पंडित यांची पत्नी डॉ. नीलम पंडित (५५) यांचा मृत्यू झाला आहे. नीलम यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला तर तन्वी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.