विजोरा : प्रतिनिधी
भरधाव वेगातील अज्ञात ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच तर दुस-याचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवार दि. ७ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाशी टोल नाक्याच्या काही अंतरावर घडली. हा अपघात इतका भीषण होता की एकाचे पायाखालची बाजू पुर्णत: चेंदामेंदा होऊन पाय तुटून बाजूला पडला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील शेलगावचे आबासाहेब निवृत्ती खराडे (वय ३८) भूम तालुक्यातील सोन्नेवाडीचे माऊली साठे (वय ४०) हे दोघे मित्र दुचाकीवर दहिफळकडून पारगावकडे जात होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते वाशी टोलनाक्यापासून काही अंतरावर असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये आबासाहेब निवृत्ती खराडे यांना जोराचा मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये त्यांच्या कमरेपासून खालचा भाग अक्षरक्ष: पुर्णत: निकामी होऊन एक पाय तुटून बाजूला पडला होता. तर दुसरे माऊली साठे हे देखील गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेत घेऊन जाताना रस्त्यातच त्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळाताच वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी एस. बी. खोत व आर बी लवटे हे घटनेच्याठिकाणी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरु होती. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये मयताच्या शरिराचे तुकडे तुकडे झाले होते. तसेच घटनास्थ रक्ताचा सडा सांडल्याचे दिसून आले. या अपघातामुळे दोन्ही कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
















