हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव व परिसरामध्ये गुरुवारी भूकंपाचे सौम्य प्रमाणात दोन धक्के बसले. असे असले तरी त्याची कुठलीही नोंद अद्याप झाली नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून देण्यात आली.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव आणि परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणे हे दोन-चार वर्षांपासून सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत भूवैज्ञानिकांनी या भागात पाहणी करून भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. १७ ऑक्टोबर रोजी दांडेगाव येथे दुपारी २:१० मिनिटाला व त्यानंतर लगेच २:१९ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भूकंपाची रिश्टर स्केल नोंद मात्र अद्याप समजू शकली नाही. याअगोदर १० जुलै रोजी ४.५ रिश्टर स्केल एवढा तीव्र भूकंपाचा धक्का दांडेगाव परिसरात जाणवला होता.
अशा प्रकारचे सौम्य तथा तीव्र स्वरूपाचे धक्के अनेकवेळा जाणवत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. भूकंपाचे तीव्र व सौम्य धक्के जाणवत असले तरी शासनस्तरावरून मात्र या नैसर्गिक आपत्तीविषयी जनजागृती किंवा सावधगिरीचा धीर देणारा कुठलाही सल्ला दिला जात नाही, असे माधव मारकळ, संतोष बेंडे या नागरिकांनी सांगितले.