25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रपरीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर पळविणारे दोघे फरारच, दोघांना जामीन

परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर पळविणारे दोघे फरारच, दोघांना जामीन

परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर पळविणारे दोघे फरारच, दोघांना जामीन

धारूर : येथील जिल्हा परिषद शाळा परीक्षा केंद्रात शनिवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी विषयाच्या पेपरफुटीनंतर दोघांना अटक करून त्यांची जामिनावर सुटकादेखील झाली. दरम्यान, इतर दोन आरोपींचा शोध सुरू असून यापुढे केंद्रावर गैरप्रकार होऊ नये म्हणून कडक उपाययोजना करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिका-यांनी सांगितले.

पेपरफुटीबद्दल पोलिस हवालदार शशिकांत घुले यांच्या फिर्यादीवरून अमोल राम सिरसट, विजय मुंडे, प्रणव औताडे (रा. धारूर), तुषार अरुण भालेराव (रा. चोरांबा, ता. धारूर) या चौघांविरुद्ध कलम ३ (५) बीएनएससह कलम महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

अमोल सिरसट व तुषार भालेराव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस व सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. तर विजय मुंडे, प्रणव औताडे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सपोनि वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. अशोक गवळी तपास करीत आहेत. दरम्यान, या केंद्रावर शहरातील पाच शाळांचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शिक्षण विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून बोर्डाला कळवले असून परीक्षा केंद्राबाहेर वाढीव पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

कठोर तपास करणार
परीक्षा केंद्रातून पेपर पळवल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी करून नोटीस देऊन सोडण्यात आले. फरार आरोपी लवकरच ताब्यात घेऊन योग्य तपास करून दोषींना कडक सजा होईल असा तपास पोलिस करतील. परीक्षा केंद्राबाहेर कडक बंदोबस्त ठेवला जाईल, असे पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी सांगितले.

गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन
धारूर परीक्षा केंद्रावर पेपर पळवल्याप्रकरणी वरिष्ठांना कळवण्यात आले आहे. या पुढील काळात कडक पोलिस बंदोबस्तात तसेच शिक्षण विभागाचे बैठे पथक नियमित ठेवून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR