सोलापूर-
सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अट्टल गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून ५ लाख १७ हजार ६५९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी १२२.५ ग्रॅम सोने, ३३.५ तोळ्याचे चांदीचे दागिने, काळवीटाची १० शिंगे, ४ जाळे, १ बनावट पिस्टल, २ जिवंत काडतुस हस्तगत केले आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा २२ गुन्ह्यात पाहिजे होता तर ६ गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झालेला आरोपी आहे. लक्ष्मण चन्नप्पा पुजारी (रा.
चिंचोळी, ता. अक्कलकोट) आणि सिध्या झिझिंग्या पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. दोन्ही आरोपींची याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे चौकात लक्ष्मण पुजारी यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे पॅन्टीत खवलेले १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंतकाडतुसे मिळून आली. त्याचकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे पिस्टल व काडतूसे ही सिध्या पवार (रा. कलर्जाळ) याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले.
त्यामुळे याबाबत पोलिसांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून लक्ष्मण पुजारी यास अटक केली. लक्ष्मण पुजारी यास पिस्टल वकाडतुसे देणारा तसेच घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपी सिध्या झिझिंग्या पवार हा तेरा मैल चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेरा मैल चौकात सापळा लावून सिध्या पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.