पुणे : शहरात रस्त्याच्या कामासाठी विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना कंत्राटदाराच्या दोन कर्मचा-यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. यातील एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा कामगार जखमी झाला आहे. हा अपघात प्रांत कार्यालयालगत मंगळवारी दुपारी घडला.
सचिन रवींद्र वटी (वय २०, मूळ रा. देवरी, जि. गोंदिया) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून स्वप्निल राधेश्याम मानकर (वय २०, रा. देवरी, जि. गोंदिया) असे जखमी कामगाराचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी अधिका-यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या घटनेस जबाबदार असणारा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुळात ज्या भागात भूमिगत वीजवाहिनी टाकणे गरजेचे होते. त्याच ठिकाणी अत्यंत धोकादायक पद्धतीने हे काम करण्यात येत होते. मोठ्या प्रमाणावर यासाठी प्रांत कार्यालयाच्या समोर झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यातूनच हा दुर्दैवी अपघात घडल्याची चर्चा राजगुरूनगर शहरात आहे. अत्यंत बेजबाबदारपणे काम करणा-या कामाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.