18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाझ्यासोबत घातपाताचा प्रकार ; मनोज जरांगे

माझ्यासोबत घातपाताचा प्रकार ; मनोज जरांगे

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दौ-यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

वयस्कर माणसाला कोण मारणार?
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या, ईमेल, मॅसेज येत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. वयस्कर माणसाला कोण मारणार, मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे? असा खोचक सवाल करत, त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. तर आपण त्यांच्यासारखा बनाव करत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR