माढा : कुर्डुवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये काही टोळ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाइलमधील वेगवेगळ्या अॅपद्वारे सुंदर महिला व मुलींचे फोटो एडिट करून युवकांना आकर्षित करीत आहेत. मैत्री झाल्यानंतर संबंधितांना भेटण्यासाठी बोलावून निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्या टोळ्यांच्या इतर सदस्यांच्या मदतीने त्याला मारहाण करून मोठ्या रकमेची मागणी करून लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन कुईवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
कुईवाडी पोलिस ठाण्यात पडसाळी येथील शेतकरी अपहरणप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक चिल्लावार पुढे म्हणाले की, सध्या सोशल मीडियातून सुंदर मुलींचे व महिलांचे फोटो अपलोड करून त्यानंतर मैत्री केलेल्या युवकास भेटण्यासाठी बोलावून घेऊन त्यास निर्जन स्थळी घेऊन जाऊन टोळीतील सदस्यांच्या मदतीने त्यास मारहाण करून त्याच्या नातेवाइकांना फोन करून पैशांची मागणी करतान आढळत आहे. रस्त्याने जाणाऱ्या मोटरसायकलवरील लोकांना लिफ मागून त्यांना पुढे सोडण्याची मदत करण्याची विनंती करून त्यांनार्ह निर्जनस्थळी नेऊन लुटत आहेत.
टोळीतील सदस्यांच्या मदतीने मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तूही लुबाडून पुन्हा वरून मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती सोबत सोशल मीडिया वरती किंवा प्रत्यक्षात मैत्री करून चॅटिंग करू नये, तसेच प्रवास करताना अनोळख्या व्यक्तींना वाहनात व वाहनावर लिफ्ट देऊ नये, असेही आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे.