कुडाळ : या वर्षीचा निधी संपला की, ३१ मार्चनंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला. कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असे विधान केले.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले मी तुम्हाला विश्वास देतो की, येणा-या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही.
मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढा. जिथे जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढे मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही असे विधान नितेश राणे यांनी केले.
कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा; भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही. त्याची चिंता करू नका. हे भाषण ऐकून उरले सुरले कोण असतील, तर आताच सांगा. चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेतो. पुढची तारीख बुक करून टाकू, असे नितेश राणे म्हणाले.
जिल्हा नियोजनचा निधी किंवा कुठलाही निधी केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही, जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरपंच असतील त्या गावाला एक रुपयाही देणार नाही, ज्यांना निधी हवा असेल त्यांनी पक्षप्रवेश करावा, ही मंत्रीमहोदयांची भाषा बघता नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
३१ मार्च संपू दे. या वर्षीच्या निधीचा विषय संपला की, पुढच्या वर्षी याद्या घेऊन बसणार. गावांची नावे घेऊन बसणार. महायुतीचा झेंडा दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.