मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. मात्र ही भेट केवळ सदिच्छा भेट होती यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे उदय सामंत भेटीनंतर म्हणाले. मनसे आणि शिवसेना युतीबददल बोलणे ही माझ्या कक्षेतील गोष्ट नाही त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलतील असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक,रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा येत्या दोन-तीन दिवसांत सुटेल असेही ते म्हणाले.
उदय सामंत हे सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यामुळे विविध चर्चांना उधाण आले. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप-शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. या भेटी त्याचाच एक भाग असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगून उदय सामंत म्हणाले, विश्व मराठी साहित्य संमेलनाला राज ठाकरे उपस्थित होते त्यांचे आभार मानायसाठी ही भेट होती.
मराठी भाषेसंदर्भात, विश्व मराठी संमेलनबाबत, दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबाबत आम्ही गप्पा मारल्या. राजकीय कोणतीही चर्चा नाही. ही अतिशय साधी भेट होती. राज ठाकरेंबरोबर चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी कळत असतात. राजकारणा पलिकडे जाउन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते असे सामंत म्हणाले.
पालकमंत्रीपदाचा वाद सुटेल
नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत गेला आहे का असा प्रश्न विचारला असता अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठक ही प्रशासकीय कामांसंदर्भात आहे. महाराष्ट्रातील विकासकामे, २० लाख लोकांना घरेवाटप यांच्याबाबत त्यांची भेट आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा हा येत्या दोन ते तीन दिवसांत सुटेल असे उदय सामंत म्हणाले. शिवसेना-मनसे युती हा विषय माझ्याकक्षेबाहेरचा आहे त्याबाबत एकनाथ शिंदेच बोलू शकतात असेही ते म्हणाले. रविंद्र धंगेकर यांनी खांद्यावर भगवे उपरणे घातले आहे, भविष्यात त्यावर जर आमचा धनुष्यबाण दिसला तर आनंदच वाटेल असे सूचक वक्तव्यही उदय सामंत यांनी केले.