12.9 C
Latur
Tuesday, November 18, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव-राज ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला एकत्र अभिवादन

उद्धव-राज ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला एकत्र अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी
अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर मतभेद गाडून एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरे या बंधूंनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजीपार्क येथील स्मृतिस्थळावर एकत्र येऊन अभिवादन केले. दोन्ही भावांनी एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती व तब्बल १३ वर्षांनंतर स्मृतिस्थळावर एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी अभिवादन केले. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी नेत्यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले. सकाळी, ११ च्या सुमारास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे हे स्मृतिस्थळावर दाखल आले व त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले. त्यांनी अभिवादन केल्यानंतर राज आणि उद्धव यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. अर्ध्या तासांच्या उपस्थितीनंतर राज ठाकरे परत जाण्यास निघाले तेव्हा आदित्य ठाकरे हेही त्यांना गाडीपर्यंत सोडण्यास आले होते. यानिमित्त अनेक वर्षांपासून राज आणि उद्धव यांच्यात असलेली कटुता दूर झाल्याचे दिसले.

दरम्यान, प्रकृती अस्वास्थामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, तरीही राऊत हे सकाळी शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार, खासदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रखर पुरस्कर्ते आणि सनातन संस्कृतीचे खंदे पहारेकरी आरदणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीस श्रद्धापूर्वक नमस्कार. राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात नेहमीच एखाद्या मजबूत ढालीसारख्या उभ्या राहणा-या बाळासाहेबांनी आयुष्यभर संस्कृती आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी कधीही सिद्धांत आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही. प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी ते मूल्यधारित राजकीय आयुष्याची प्रेरणा आहेत.

पुण्यतिथीच्या निमित्ताने बाळासाहेबांना कोटी कोटी नमन असे अमित शहा म्हणाले. तर वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर आम्ही सातत्याने चालत राहू अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, जननेता, हिंदुत्वाचे ओजस्वी स्वर आणि शिवसेनेचे संस्थापक आदरनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली! बाळासाहेबांनी राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडले आणि जनसेवेला जनगौरवाचे माध्यम बनवले. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य, स्पष्टवक्ता स्वभाव आणि सांस्कृतिक स्वाभिमान यांचे प्रतीक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR