मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, स्वत: उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचे आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
संजय निरुपम यांचे काय होणार?
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना ५ लाख ७० हजार ०६३ मते मिळाली होती. तर, काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना ३ लाख ९ हजार ७३५ मते मिळाली होती. त्यामुळे कीर्तिकर यांचा विजय झाला होता. मात्र, यंदा महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे संजय निरुपम यांचे काय होणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे जागावाटपादरम्यान काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता अशीही चर्चा आहे.