मुंबई (प्रतिनिधी) : तीन दिवसांच्या दिल्ली दौ-याहून परतलेले उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात सभा घेणार आहेत. पक्षाच्या भगवा सप्ताहानिमित्त मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी ठाण्यात भगवा सप्ताहानिमित्त पक्ष पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ६.३० वाजता होणा-या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे या वेळी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाण्यात झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे या मेळाव्याची शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात ठाकरेंनी शिवसंकल्प मेळावा घेऊन सत्ताधा-यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर दिल्ली दौ-यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी विविध पक्षांतील तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. दिल्ली दौ-यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. आता ठाण्यात मेळावा होणार असल्याने उद्धव ठाकरे विरोधकांना कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.