मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी आपल्याला दोन वेळा केला होता असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी आज केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करताना, सालियन प्रकरणात पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही? असा सवाल करत राणे गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी फेरचौकशी व्हावी, या मागणीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटून सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.
या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंचे आपल्याला दोनदा फोन आले होते. मी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. एक मंत्री त्यावेळी उपस्थित होता असेच म्हटले आहे. पण आदित्य संध्याकाळी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाण्यापासून त्याला सांभाळा इतकेच मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते, असे नारायण राणे म्हणाले. आदित्य संध्याकाळी कुठे जातो, दिनो मोरियाच्या घरी तीन चार तास चालते याची आपल्याकडे पूर्ण माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो त्याला सांभाळा असे म्हणालो, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मी पाहतो,तुम्ही सहकार्य करा, असे ते म्हणाल्याचा दावा त्यांनी केला.
सतीश सालियन यांच्यावर तेव्हा दबाव होता. किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी जायच्या त्यांचा दबाव होता. मनात नसताना सालियन यांना दबाव नाही असे बोलावे लागत होते. त्यावेळी त्यांना पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग मदत करत नव्हता. रूग्णवाहिका बदलली. प्रकरण दडपण्यासाठी सर्व प्रकार झाले. वडिलांना दबाव कमी झाल्यानंतर आात त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तो सचिन वाझे ताब्यात आहे त्याला चार फटके दिले की सर्व सांगेल. कर्ता करविता वाझे आहे असेही नारायण राणे म्हणाले. या प्रकरणी आतापर्यंतच्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करा, अटक करा असेही ते म्हणाले.
मी चित्रा वाघ यांच्यासोबत
चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे म्हणाले, अनिल परब यांनी आक्रमकतेची भाषा करू नये. त्यांच्या शिवसेनेत आता कोणी राहिले नाही. चित्रा वाघ या भाजपच्या आहेत. त्या एकटया नाहीत. त्यांच्यासोबत पूर्ण भाजप आहे आणि नारायण राणे आहे. कोणत्या मैदानात यायचे ते परब यांनी सांगावे, मी मैदानात येतो असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणातील प्रशांत कोरटकर सापडत नसल्याबददल पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असेल तिथून शोधून काढले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र दैवत मानतो. त्यांना कोणी बोलले असेल तर वाचू शकत नाही. तो किती पळाला तरी त्याला अटक होईल, कारवाई होईल असे बोलून त्याला महाराष्ट्रात फिरता येणार नाही असेही नारायण राणे म्हणाले.