सोलापूर : विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे, प्रचाराचा धुरळा उडालाय. महायुती आणि मविआ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौ-यात भाजपला जोरदार धक्का दिला. भाजपच्या माजी आमदाराने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार बिराजदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षप्रवेश झाला. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. ऐन विधानसभेला शिवशरण बिराजदार पाटील यांनी साथ सोडल्याचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
शिवशरण पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच भाजपवर टीका केली. त्याशिवाय मी माझ्या घरी परत आलो याचा मला खूप आनंद होत आहे, असे वक्तव्यही केले. माझी वाट चुकली होती, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला. शिवशरण पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
शिवशरण पाटील काय म्हणाले?
मी माझ्या घरी परत आलो, याचा मला खूप आनंद होत आहे. तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होतं आणि आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात शिवबंधन बांधलं.