20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधात दंड थोपटले

उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधात दंड थोपटले

१६ तारखेला अदानींच्या कार्यालयाला देणार धडक

मुंबई : केंद्र सरकारने मुंबईमधील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. धारावीमध्ये काही छोटे उद्योगही आहेत त्यांचेही पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यासोबतच टीडीआरच्या मुद्यावरूनही ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले असून येत्या १६ तारखेला अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

धारावीकरांचे पुनर्वसन जिथल्या तिथे झाले पाहिजे. माहीम निसर्ग उद्यान, रस्ते त्यात धरले आहे का? या गोष्टी स्पष्ट पाहिजेत. प्रकल्प करताना सूचना आणि हरकती जनतेकडून घेतल्या जातात. सरकार म्हणते आम्ही हमी देऊ पण तुम्ही सूचना आणि हरकती घेतल्याच नाहीत तर हमी कसली घेणार आहात. तसे नाही झाले तर आम्ही आमची ताकद दाखवू.

एवढ्या मोठ्या वस्तीला पाणी कुठून आणणार. नियोजनशून्यतेमुळे मुंबईकरांचा जीव घुसमटत आहे. मुंबईत यापूर्वी कधीच एवढे प्रदूषण पाहिले नाही. हे सरकार केवळ कंत्राटदारांसाठी काम करत आहे. रस्त्याचे कंत्राट असेल, आणखी कसले असो. प्रदूषण हे नियोजनशून्य कामामुळे होत आहे.

हे सरकार कंत्राटदारांचे आहे. मुंबईचे तीन प्रकल्प यांच्या घशात घालण्याचे काम सरकार करत आहे. अभ्युदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन याचा पुनर्विकास अदानी यांना देण्याचा घाट आहे. पूर्वी ‘सब भूमी गोपाल की’ म्हणायचो, आता ‘सब मुंबई अदानी की’ असे झाले आहे. ही मुंबई मुंबईकरांनी रक्त सांडवून मिळवली, आम्ही ही मुंबई कुणाच्या घशात जाऊ देणार नाही. या सर्वांचा सरकार आणि अदानीला जाब विचारण्यासाठी १६ तारखेला आम्ही मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR