मुंबई (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याने विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूकही एकत्र लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवला असला तरी अजूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शिवसेनेने परस्पर तीन उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. याबद्दल सौम्य शब्दात आपली नाराजी व्यक्त व्यक्त करताना, अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वीच सांगली, दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. परंतु वाद टाळण्यासाठी काँग्रेसने तडजोड केली. लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर पुढील निवडणुका अधिक समन्वयाने लढवण्याचे सांगितले गेले. पण शिवसेनेने निवडणूक होत असलेल्या विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. याबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नाराजी व्यक्त केली. कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघापैकी कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबईचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. आधी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजुनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही नाना पटोले म्हणाले. पूर्वी भाजपासोबत युती असतानाही भाजपाच्या लोकांची उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत अशी तक्रार असायची. आता त्याचीच पुनरावृत्ती सुरू झाल्याची तक्रार ऐकायला येत आहे.
नीट परिक्षाच रद्द करा
नीट परिक्षेत घोटाळा झालेला असून डॉक्टर बनण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परिक्षेचे सर्व नियंत्रण केंद्र सरकारकडे असते, ही परीक्षाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात पण या भ्रष्टाचारामुळे पालक व विद्यार्थ्यांची घोर निराशा होत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी डॉक्टर होऊ नये हे भाजपाचे षडयंत्र आहे. नीट परीक्षा जुन्याच पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी करत नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपाला आता आरएसएसची गरज नाही
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील रालोआ सरकारला दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला काहीही सल्ला दिला तरी ते सरकार मानेल असे वाटत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.