छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांना प्रशासनाबद्दल काहीही माहिती नाही. काही गोष्टींच्या विशिष्ट गाईडलाईन्स ठरलेल्या असतात. सत्तेत असताना जे काही देऊ शकले नाहीत, ते आता केवळ बोंबलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी उगाच डायलॉगबाजी करू नये असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, पाऊस न झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून दुबार पेरणीचाही फायदा होणार नाही, असे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेतली आहे. राज्य सरकार मदत जाहीर करू शकते; पण केंद्र सरकारकडून भरीव मदत आली तरच शेतक-यांना मोठा दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकारची मदत घेण्यासाठी ठराविक तारखा आणि प्रक्रियेचे पालन करावे लागते. सरकार या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.
दिशा सालियान प्रकरणावर भाष्य
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंचा संबंध आहे की नाही यावर आम्ही बोलत नाही. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिले आहेत आणि दिशा सालियान यांच्या वडिलांच्या जबाबात नाव आहे. आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर ते या प्रकरणातून सुटतील. आम्ही कोणालाही मुद्दाम त्रास देत नाही. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे कदाचित आदित्य ठाकरे अधिक अडचणीत येऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
वीज पडून मृत झालेल्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड आणि सिल्लोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून काही शेतमजुरांचा मृत्यू झाला. या अत्यंत गरीब कुटुंबांना १ ते २ दिवसांत तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.
















