22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रगुवाहाटीला निघताना उद्धव ठाकरेंना सांगितले होते

गुवाहाटीला निघताना उद्धव ठाकरेंना सांगितले होते

बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट ठाकरेंनी मनावर घेतले नसल्याचा दावा

अमरावती : राज्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून राज्यात मतदानानंतर प्रचाराचा धुराळा शांत झाला आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौ-याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता. पण, तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला. राजकारणात काहीही घडू शकते. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येते असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, भाऊ नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्याविरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये, त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते, असे बच्चू कडू म्हणाले.

याचबरोबर, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद शमताना दिसत आहे. रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील, असेही विधान बच्चू कडू यांनी केले आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत आम्ही पाठिंबा दिलेला उमेदवारच निवडून येणार आहे. नवनीत राणा निवडून येणार नाहीत. टेक्निकल काय निकाल लागतो, ते माहीत नाही. सट्टा बाजारात कुणाचा काहीही भाव असला तरीही आम्ही ज्या प्रकारे आम्ही प्रचार केला त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. शेतकरी, मजूरवर्ग यांचे प्रश्न आम्ही मांडले आहेत. ही निवडणूक आम्ही जिंकलो आहे, आता ४ तारखेला चित्र स्पष्ट होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR