22.3 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरयुतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू

युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू

अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला

सिल्लोड : सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला. या प्रचारसभेनंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिल्ला करणार आहे. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही.

उबाठाचा सुपडासाफ करणार आहे. मला काय जेलमध्ये टाकता उद्धव ठाकरे यांच्या अजून ४ चौकशा बाकी आहेत. युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू , असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथून टाकण्यात व मुख्यमंत्री बदलण्याच्या भूमिकेत माझी प्रमुख भूमिका होती. त्यामुळे ठाकरे यांचा थयथयाट होत आहे. भाजप शिवसेनेचा दुश्मन आहे आणि मला पाडण्यासाठी तुम्ही भाजपाच्या पाया पडताय. भाजपच्या मतांची भीक मागताय, असा सनसनाटी पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले होते. तुमचे आमचे (भाजप-उद्धवसेना) मतभेद आहेत. त्याच्यासाठी कुणी माझ्याशी बोलायला तयार असाल, तर मी बोलायला तयार आहे. पण, आता आपण सर्व मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुऊन टाकू. या सिल्लोडची दहशत, गुंडागर्दी दूर करण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून द्या व गद्दार सत्तार यांना पाडा, नव्हे तर गाडा, असे वक्तव्य केले होते.

मोदींना शिव्या देता अन् भाजपची मदत मागता..
२०१९ मध्ये त्यांना माझी दहशत, दादागिरी दिसली नाही का? मी दहशत माजवतो. लांडा बाडा आहे, याची अक्कल तेव्हा नव्हती का? तेव्हा माझी आरती करत होते? एका मंचावर मोदींना आणि भाजपला शिव्या देता आणि त्याच मंचावर सत्तारला गाडण्यासाठी भाजपला मदत करा, असे आवाहन करता हे कोणते राजकारण आहे? त्यांना डोक्याच्या डॉक्टरला दाखवावे लागेल, असा टोला अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

दानवे माझ्या सोबत आहेत
उद्धव ठाकरे व उद्धवसेनेचा उमेदवार घाबरला आहे. म्हणून भाजपला मतांची भीक मागत आहे. मी युतीचा उमेदवार आहे. भाजप आणि दानवे माझ्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे यांना सिल्लोडमधून काही मिळणार नाही. पण, याचा फटका त्यांच्या जिल्ह्यातील उमेदवारांना बसेल. जिल्ह्यात उबाठाचा सुपडा साफ होईल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR