22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या घोषणेने आघाडीत बिघाडी?

उद्धव ठाकरेंच्या घोषणेने आघाडीत बिघाडी?

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका घोषणेवरून आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आधी संजय निरुपम आणि आता वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. निर्णय अद्याप झालेला नाही, असे गायकवाड म्हणाल्या आहेत. तर, निरुपम यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारीची घोषणा केल्याने, याच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, ‘‘महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की, आतापर्यंत दोन डझन बैठका महाविकास आघाडीच्या झाल्या आहेत.

८ ते ९ जागांवर अजूनही निर्णय झाला नाही. त्यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा आहे, यावर निर्णय झाला नाही. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागरदास रोड अंधेरी येथील शाखेत येतात आणि अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करतात. ज्या जागेवर अजून निर्णय झाला नाही, ती जागा जाहीर केली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी धर्म पाळला जात नाही, असे निरुपम म्हणाले.

महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू : वर्षा गायकवाड
दरम्यान यावरूनच वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘‘मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात हे नमूद करू इच्छिते की, महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. निर्णय अद्याप झालेला नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

उमेदवारीची घोषणा मागे घ्या…: निरुपम
मी शिवसेना पक्षावर आरोप करत नाही. मी फक्त हे सांगतोय, जर खिचडी घोटाळ्यात यांचे नाव असेल, तर त्यांचा प्रचार शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना करावा लागणार का? असा सवाल निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, जी उमेदवारी तुम्ही जाहीर केली आहे ती घोषणा मागे घ्यावी. ही जागा आधीपासून काँग्रेस पक्षाची आहे. अमोल कीर्तिकर लहान होते तेव्हापासून, त्यांना माहीत पण नसेल की ही जागा काँग्रेसची आहे. मी निवडणूक लढवणार, आता जागावाटपाचा निर्णय होऊ द्या. जागा कोणाला जाते बघू. त्यानंतर माझी भूमिका सांगणार असल्याचे निरुपम म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR