मॉस्को : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ३ वर्षांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धाला आगामी काळात विराम मिळेल, अशी चर्चा असतानाच आज युक्रेनने रशियातील ओलेन्या आणि बेलान्या या ४ एअरबेसवर शक्तिशाली हल्ला केला. यूक्रेनच्या सैन्याने यासाठी ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यात ४० हून अधिक रशियन लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या विमानांचा वापर रशियाकडून यूक्रेनवर बॉम्ब हल्ला करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे ही लढाऊ विमाने युक्रेनने नष्ट केली. परंतु रशियाने या हल्ल्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, या हल्ल्याचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या व्हिडीओत लढाऊ विमानांना आग लागलेली बघायला मिळत आहे. युक्रेनने रशियाच्या ओलेन्या आणि बेलाया यासह आणखी २ एअरबेसवर हल्ला करून या एअरबेसवरील ४० लढाऊ विमाने नष्ट केली. हल्ला बरोबर लढाऊ विमानांवरच करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या एअरबेसवर हल्ला केला ते रशिया आणि युक्रेनच्या बॉर्डरपासून खूप लांब आहेत. तरीदेखील युक्रेनकडून इतका मोठा हल्ला केला.
ड्रोनने रशियाच्या क्षेत्रात जाऊन बॉम्बर्स विमानांवर हल्ले केले. टीयू-९५, टीयू-२२ आणि ए-५० सारख्या हेरगिरी करणा-या विमानाला नुकसान पोहोचवले. रशियाकडून ज्या एअरबेसचा वापर हा युक्रेनवर बॉम्ब हल्ले करण्यासाठी केला जात होता, त्याच एअरबेसवर युक्रेनने हल्ला केला आहे. युक्रेनच्या सुरक्षा एजन्सी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने रशियाच्या सैन्याचे मोठे नुकसान केले आहे. त्यांनी ४० पेक्षा जास्त विमानांना लक्ष्य केले. रशिया हे विमान युक्रेनवर मिसाइल हल्ल्यासाठी वापरत होते.
यूक्रेनकडून चार हवाई तळांवर हल्ले
यूक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेबद्वारे रशियात स्पेशल ऑपरेशन सुरु केले. यूक्रेनने हा हल्ला रशियाच्या दीर्घ टप्प्यातील हल्ल्याची क्षमता खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. युक्रेनने रशियाच्या ४ हवाई तळांवर असलेल्या ४० लढाऊ विमानांवर हल्ला केला. यात बेलाया एअरबेस, ओलेन्या, ड्यागिलेवो आणि ल्वानोवे एअरबेसवर ड्रोन हल्ला केला.
रशियाच्या प्रमुख लढाऊ विमानांना केले लक्ष्य
यूक्रेनकडून ज्या विमानांवर हल्ले करण्यात आले ती रशियासाठी महत्त्वाची आहेत. टीयू-९५ हे १९५० च्या दशकातील जुने विमान आहे. हे विमान अजून देखील क्रूझ मिसाईल घेऊन जाण्यास सक्षम आहे. जे दूर अंतरावरच्या शहरांना लक्ष्य करु शकते. टीयू-२२ हे लढाऊ विमानही तितकेच महत्त्वाचे आहे.
सर्वांत मोठा ड्रोन हल्ला
युक्रेनने रशियावर हल्ल्यांसाठी ड्रोनची मदत घेतली असून, ज्या ठिकाणी हल्ले केले, ती ठिकाणे रशिया-युक्रेनच्या सीमेपासून फार दूर आहेत. युक्रेनमधील माध्यमांनुसार युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, रशियाने अद्याप या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही.