कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडावर लागून असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवले आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पावनगडावर अनधिकृतपणे मदरसा चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने रात्रीपासून पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पावनगडावर जाणा-या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही कारवाई रात्रीपासून सुरू करण्यात आली असून अद्याप ही कारवाई सुरू आहे. पन्हाळगडावर आक्रमण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाला लागूनच पावनगडाची उभारणी केली.
मात्र याच ऐतिहासिक पावनगडावर अनधिकृतपणे मदरसे सुरू असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यानंतर प्रशासनाने याची दखल घेत तपासणी केली असता गडावर या मदरशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार यासह परिसरातील काही नागरिक येत असल्याची माहिती समोर आली. यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने हा मदरसा हटवण्याची कारवाई सुरू केली असून पावनगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.