कराड : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील त्यांच्या समाधीस्थळी श्रध्दांजली वाहण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे कर्जत- जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हे समोरसमोर आले. त्यावेळी नेहमीच्या शैलीत बोलताना ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं, अशी मिश्कील फिरकी घेत अजित पवारांनी ‘काकांचे दर्शन घे’ असे म्हणताच रोहित पवारांनी त्यांचे चरणस्पर्श केले आणि बारामतीचे पवार कुटुंब राजकीयदृष्ट्या एकच असल्याचे सूर व त्याचे पडसाद राज्यभर उमटले.
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात आज सोमवारी सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील अजितदादा आणि रोहित पवारांची दिलखुलास भेट उपस्थितांना आव्वाक करणारी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आणि विधानसभेच्या निकालानंतर बारामतीच्या काका-पुतण्याच्या या अचानक घडलेल्या भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवया ताणल्या गेल्या. माध्यमांना खुमासदार वेगळा विषय मिळाला. कारण या वेळी अजित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात माझी सभा न झाल्याने अल्प मताधिक्यातील पुतण्या रोहितला त्याचा नामी फायदा झाला.
एका अंगाने ही राजकीय मदतच झाल्याची चर्चा सुरु झाल्याचे सूचित केले. यावर कर्जत-जामखेडचे केवळ १,२४३ मतांनी पराभूत झालेले ‘महायुती’चे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी काका-पुतण्याच्या कटाचा मी बळी ठरल्याचा आरोप केला तर या सा-या घटनाक्रमाने राज्यभर खळबळ उडवून दिली.
काका आहेत म्हणून पाया पडलो
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, ते माझे काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या गेल्या २०१९ च्या निवडणुकीत मला त्यांनी खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने तसेच ते माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही माझी जबाबदारी आहे.