पुणे : प्रतिनिधी
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातही सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. आणि आता त्याच पुण्यात निवडणुकीच्या लढाईला सुरूवात झाली आहे. पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला असून भाजपकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणाबाबत चांगलेच ट्रोलिंग सुरू झाले आहे.
सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असून निवडणुकांसाठीही या माध्यमाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर निवडणुकीची लढाई सुरू असून भाजपनेही या अस्त्राचा वापर करत धंगेकरांचे ट्रोलिंग सुरू केले आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त ८ वी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचे शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
जनतेने मला पीएचडी दिली
धंगेकरांकडून चोख प्रत्युत्तर
मात्र भाजपचं हे ट्रोंिलग धंगेकरांनी फारसे मनावर घेतलेले नाही, उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतो’ असे सांगत माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिले आहे . कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का तुम्ही? जनतेची नाळ अन् जनतेचा विकास यात माझी पीएचडी झाली आहे. जनतेला काय हवे ते मला कळते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिक्षणही आठवी होते. वसंतदादा पाटील वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणले ते चौथी पास असल्याचे म्हणतात, तुम्हाला शिक्षणाचे एवढे ं ज्ञान आहे तर मग राज्यातील ८३ टक्के तरुण बेरोजगार का फिरताहेत? माझं शिक्षण काढणं हा विरोधकांचा दूधखुळापणा आहे. असे धंगेकर म्हणाले.