24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयअनपेक्षित निकाल!

अनपेक्षित निकाल!

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल समजल्या जाणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपची लाट दिसून आली. या तिन्ही राज्यांत भाजप पक्ष वरचढ ठरला. राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेसच्या ताब्यात होती. ती भाजपने हिसकावून घेतली. मध्य प्रदेशमध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली. तेलंगणमध्ये काँग्रेसने बीआरएसला सत्तेवरून खाली खेचले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निवडणुकीकडे ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिले जात होते. यात काँग्रेसला अपयश आल्याचे दिसते. राजस्थानमध्ये दर पाच वर्षाला सत्ताबदल होतो, ती परंपरा या राज्याने कायम ठेवली. काँगे्रसने छत्तीसगडची सत्ता राखायला हवी होती परंतु काँग्रेसचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे आता काँग्रेसने आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता होती. ती कायम राखण्यात भाजपला यश आले.

भाजपने येथे आपली सत्ता नुसती राखली नाही तर सर्वाधिक १६३ जागा जिंकल्या. येथे काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र या वेळी ती काँग्रेसच्या हातून निसटली. राजस्थानने पाच वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा कायम ठेवली. खरे तर ही परंपरा बदलण्याची काँग्रेसला संधी होती. मात्र ती काँग्रेसने गमावली असे म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. अंतर्गत गटबाजी सातत्याने उफाळून येत होती. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा यश मिळविणे जमले नाही. कदाचित अखेरच्या वर्षात तरुण तुर्क सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली असती तर राजस्थानमध्ये वेगळा बदल बघावयास मिळाला असता. पायलट नेहमीच नाराजीच्या सूरात वावरताना दिसले. गेहलोत नेहमीच आपले राज्य आणि आमदार वाचविण्याच्या प्रयत्नांत दिसले. म्हणजे काँगे्रसचे खच्चीकरण काँग्रेसनेच केल्याचे दिसते. तेलंगणा राज्यात मात्र काँग्रेसला फायदा झाला. तेलंगणा राज्य अस्तित्वात आल्यापासून चंद्रशेखर राव यांनी दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले होते. तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारात परिवर्तनाचा मुद्दा खूप गाजला होता.

विद्यमान सरकारच्या विरोधात चोहो बाजूंनी हल्लाबोल झाल्याने आता राज्यात बदल हवा, अशी एक लाट तयार झाली. काँगे्रसने या लाटेवर स्वार होत स्वत:ला परिवर्तनाचे साक्षीदार ठरविले. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपला पक्ष राष्ट्रीय करण्यावर भर दिल्यामुळे त्यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येते. तेलंगणातील समस्यांवर मात करण्यात केसीआर अपयशी ठरले. तेलंगणात काँग्रेसला ६४, बीआरएसला ३९ तर भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले. राजस्थानमध्ये भाजपला ११५, काँग्रेसला ६९ तर इतर १३ अशी स्थिती राहिली. या चार राज्यांच्या निवडणुकांवर असे दिसून येते की, उत्तरेत भाजपचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र दक्षिणेत भाजपला अजूनही चंचुप्रवेश करता आलेला नाही. हिंदी भाषिक राज्यांमधील दोन महत्त्वाच्या राज्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने त्याचा २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. या दोन हिंदी भाषिक राज्यांप्रमाणे छत्तीसगड हे काँग्रेसची सत्ता असलेले राज्य भाजपने जिंकले. मात्र तेलंगणात भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) जबर धक्का बसला. तेथे काँग्रेसला सत्ता मिळाली.

चार राज्यांचे निवडणूक निकाल पाहता मतदारांनी प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसलाच मतदान करणे पसंत केले. अन्य पक्ष आणि अपक्ष यांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आल्यानंतर अशा जनगणनेची मागणी अन्य राज्यांतही जोर पकडू लागली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण या निवडणुकीत आदिवासी, ओबीसी, मागास जाति-जमातीचे मतदार भाजपच्या मागे मोठ्या प्रमाणात उभे असल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या विरोधात जी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली त्या आघाडीचा प्रभावही या निवडणुकीत दिसला नाही. छत्तीसगड राज्यात महादेव अ‍ॅपसह झालेल्या विविध घोटाळ्यांच्या आरोपांचा फटका काँग्रेसला बसला. या निवडणुकीत आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष यांचा काहीच प्रभाव दिसून आला नाही. दिल्ली, पंजाब या दोन राज्यांत सत्ता प्राप्त केल्यानंतर देशातील अन्य राज्यांमध्ये आपण प्रभाव पाडू शकू, असे ‘आप’ला वाटले होते पण या निवडणुकीत तसे काही दिसून आले नाही.

तेलंगणामध्ये भाजपाची ताकद थोडी वाढल्याचे दिसून येते पण दक्षिणेतील राज्यांत आपला प्रभाव वाढविण्यासाठी भाजपला आणखी खूप मेहनत घ्यावी लागणार असे दिसते. कर्नाटकमध्ये भाजप दोन वेळा सत्तेवर होता परंतु त्यांना सत्ता टिकविता आली नाही. काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचाही परिणाम या निवडणुकांवर जाणवला नाही. उलट काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर जी टीका केली ती टीका काँग्रेसला भोवल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेत्यांनी केलेल्या आखीव प्रचारामुळे भाजपला हे यश मिळू शकले, अशी चर्चा आहे. मध्य प्रदेश सरकारने राबविलेल्या विविध योजना जनतेच्या पसंतीस पडल्याचे निकालाचा कौल पाहता दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल भाजपने जिंकली खरी परंतु फायनल जिंकण्यात ते यशस्वी होतील का? एकदिवसीय विश्वकप स्पर्धेत सेमीफायनल पर्यंतच्या लढती भारतीय संघाने दणदणीत रीत्या जिंकल्या होत्या परंतु फायनल जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. भाजपला पर्याय निर्माण करणे सोपे नसले तरी इंडिया आघाडी त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल असेच सध्याचे चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR