सोलापूर : महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापुरात लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. १५० वर्षांपासून लोधी समाज बांधवांकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात फक्त लोधी समाजच नाही तर परिसरात राहणारे राजपूत समाज, तेली समाज, मोची समाज, मुस्लीम समाज इतर सर्व समाज बांधव मिळून अतिशय उत्साहात हा उत्सव दरवर्षी साजरा करतात.
सुमारे १५० वर्षांची परंपरा असणाऱ्या लोधी समाजाच्या रंगपंचमी निमित्त शहरातून मोठी मिरवणूक निघते. या रंगाड्याच्या मिरवणुकीस मोठ्या उत्साहात बेडर पूल इथून सुरुवात करण्यात आली. लोधी समाज पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करतो. जवळपास १०० बैलगाड्यांचा ताफा, त्याचबरोबर पारंपारिक वाद्य घेऊन लोकगीत गात ही मिरवणूक परिसरात फिरते. सबंध महाराष्ट्रात फक्त सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने अशी अनोखी रंगपंचमी साजरी होत असते.