पुणे : महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
दरम्यान आयएमडीने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर ८ जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य वा-यांचा परिणाम
हवामान खात्याने दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात चक्राकार वा-यांचे क्षेत्र निर्माण होत आहे, हे सरासरी समुद्रसपाटीपासून ३.१ किमी पर्यंत पसरलेले आहे. अग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टी आणि उत्तर प्रदेश भागात नैऋत्य वा-यांचा परिणाम दिसून येत आहे.
शनिवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, या भागात शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत आहे.