22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी बरसणार

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी बरसणार

पुणे : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे ढग आहेत. मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, एक पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. हा पश्चिमी विक्षोभ ५७ डिग्री पूर्व रेखांश व ३० डिग्री उत्तर अक्षांशावर आहे. एक द्रोणिका रेषा ईशान्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत आहे. अजून एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. एक नवीन पश्चिमी विक्षोभ १ मार्चनंतर वायव्य भारताला प्रभावित करणार आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून येणारे साऊथ ईस्टर्ली व साऊथ साऊथ ईस्टर्ली प्रती चक्रीय वारे आर्द्रता घेऊन येत आहेत.

त्यामुळे कोकण, गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वा-यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज आहे. तसेच १ मार्चनंतर जसा पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल त्यावेळेस पुन्हा कोकण, गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वा-यांची परस्पर क्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज आणि १, २ मार्चला विदर्भाच्या अकोला, अमरावती, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २९ फेब्रुवारी व १ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रात किमान किंचित घट होण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान
पुणे आणि परिसरात पुढील ४८ तासांत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तर तीन व चार मार्चला आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. दोन तारखेनंतर पुढील दोन दिवस पुणे आणि परिसराच्या किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR