कळमनुरी (ता.प्रतिनिधि)
कळमनुरीसह तालुक्यात ९ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक अवकाळी पावसासह गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यात ८ आणि ९ एप्रिल रोजी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला तसेच कळमनुरी शहरात सूर्याची उष्णता कमी झाली आणि संध्याकाळपर्यंत वारे वाहू लागले.
मंगळवारी सायंकाळी उशिरा अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले आणि काही वेळातच अवकाळी पाऊस व गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीने नागरिकांची पळापळ झाली तर शहरातील काही ठिकाणी दुकानांची छपरे उडाली होती तर रस्त्यावर गारांचा खच पडला होता. पावसाने नागरिकांना उन्हापासून दिलासा दिला.