पुर्णा : तालुक्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्यरात्री २ वाजल्यापासून मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पिकांना फटका बसणार आहे.
तालुक्यात काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हरभरा पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा , तूर, गहू, ऊस, केळी, कापूस व भाजीपाला, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकाला मर लागण्याची शक्यता आहे. तसेच वेचणीस आलेल्या कापसालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे कापसाची झाडे पूर्णत: झोपली आहेत.
याचबरोबर फुलांच्या अवस्थेत असलेल्या तुरीचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
शेतक-यांनी कर्ज काढून कशीबशी हरभरा पेरणी केली होती. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यात काही ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली होती. तसेच ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पत्राची शेड कोसळल्याने नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत करावी अशी मागणी शेतक-यातून होत आहे.