पुणे : राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू आहे. वादळीवा-यासह झालेल्या गारपिटीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले असताना हवामान खात्याने अवकाळीचा मुक्काम पुन्हा वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवारीदेखील महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मूसळधार पावसाची वर्दी दिली आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व सोलापूरात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
तर काही ठिकाणी तूरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. यादरम्यान राज्यात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती आहे. तर आग्नेय राजस्थानमधील चक्राकार वा-यांपासून गुजरात, कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा सक्रिय आहे.
बुधवारी सायंकाळनंतर बीड, अकोला, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारी नागपूर येथे पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. आज, शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.