नांदेड/लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूरसह अन्य भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. नांदेड, हिंगोली, परभणीतही अवकाळीने मोठे नुकसान झाले. तसेच लातूरमध्ये वादळी वा-याची तीव्रता अधिक नसली, तरी अचानक अवकाळीने हजेरी लावल्याने उन्हाळी पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज पडून दोन ठिकाणी ३ जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत मोठी गारपीट झाली. त्यामुळे आंबे, भाजीपाला, शेतीपिके आणि द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, विदर्भातही अकोला, बुलडाण्यासह ब-याच भागात वादळी वा-यासह गारपीट झाली. त्यामुळे आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. कंधार, लोहा तालुक्यातही सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. कंधार तालुक्यात २ ठिकाणी वीज पडून ३ जनावरांचा मृत्यू झाला. या पावसामुळे शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला गहू, हरभरा आणि इतर पिके, फळझाडांचे नुकसान झाले. तसेच आंबे गळून पडल्याने मोठे नुकसान झाले. घागरदरा येथील शेतकरी विठ्ठल धोंडीबा गडंबे यांच्या शेतात दोन गाय, जनावरे बांधलेले असताना अंगावर वीज पडून ती दगावली तर पानभोसी येथील शेख शादुल युसुबसाब यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला.
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या ४ तालुक्यांसह इतर ठिकाणी जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे उन्हाळी पिके, फळबागांना मोठा फटका बसला आहे. यासोबतच लातूर शहर आणि परिसरात दुपारनंतर साडेचारच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पाऊस बरसला. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारासही पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी फळबागा, पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
विदर्भातही मोठी हानी
विदर्भात अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळे आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मोठी हानी झाली आहे.
पुढील ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. .
यंदा चांगला पाऊस होणार
दरम्यान, यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवली आहे. देशात यंदा सरासरीच्या १०२ टक्के सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे म्हटले आहे.