नागपूर : साता-यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागाच्या एका वादात अडकली होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर तिच्यावर अंतर्गत चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे ती महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. तसेच, पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने हातावर लिहिले आणि त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. घडलेल्या घटनेनंतर राजकीय नेतेमंडळींकडून महायुती सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही यावर चिंता व्यक्त केली असून रोखठोक भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर सोशल मीडिया एक्सवरून प्रतिक्रिया दिली. जेव्हा रक्षकच बनतो भक्षक! फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलिस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला.
पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलिस अत्याचार वाढत आहे. या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणा-यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही असे वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.

